Breaking News

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्यातील प्रकल्प हे करदात्यांच्या पैशातून होत असतात. पण सरकारला आर्थिक नियोजन नसल्याने केवळ ४ वर्षात या भाजप शिवसेना सरकारने राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. पुरवणी मागण्यांचा तर जागतिक विक्रम या सरकारने केला आहे. महालेखापालांनीही या सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकार पेट्रोल,डिझेलवर दुष्काळी  तसेच हायवेवरील दारूची दुकाने बंद केली म्हणून सेस लावून जनतेचे कंबरडे मोडत आहे. सत्तेवर आल्यावर मोठमोठ्या वल्गना करून श्वेतपत्रिका काढणा-या सरकारचे पितळ आता उघडे पडले आहे.

सिंचनाकरिता मागील सरकारने दिलेल्या सुधारीत प्रशासकीय मान्यतांवर बोट ठेवणा-या भाजपच्या सरकारने गेल्या तीन वर्षात ६४ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्तीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. जलयुक्त शिवारमधील घोटाळे देखील पुढे आले आहेत. याचबरोबर वित्त आयोगाने महाराष्ट्रात सिंचन क्षमतेत काडीमात्र वाढ झाली नाही. असे सांगत या सरकारला आरसा दाखवला आहे. त्यासोबतच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात जवळपास ३१ हजार गावांत भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

घोर भ्रष्टाचार केल्यानंतर आता सरकारचा भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या देवस्थानांच्या पैशावर डोळा आहे.  देवस्थानांवर स्वतःच्या पक्षाशी संबंधीत लोकांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत मनमर्जीप्रमाणे निर्णय करून घ्यायचे. हे मोदी मॉडल राज्यात सुरु आहे. रिझर्व्ह बँकेच्या पैशावरती मोदी सरकार ज्या पध्दतीने डोळा ठेवून आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्रातील विविध देवस्थानांकडील पैशावर सरकारचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *