Breaking News

१२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नी न्यायालयात जाणार महाविकास आघाडीच्या विरोधात मागणार दाद अॅड आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने, षडयंत्र रचून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले असून त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, मुंबईचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर, आमदार योगश सागर, पराग अळवणी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अधिवेशनात निलंबित केलेल्या १२ आमदारांची आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी कायदेविषयक कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसांचे अधिवेशनात आम्हा १२ आमदारांचे झालेले निलंबन हे एक षडयंत्र असून सुडबुध्दीने ही कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनाच्या कारवाई दरम्यान पडद्यामागे जे घडले त्यातील अनेक धक्कादायक माहिती आता आमच्या पर्यंत येते आहे. ती योग्य वेळी आम्ही उघड करु. योग्य वेळी स्फोट करु. सुडबुध्दीने केलेल्या कारवाईत ज्यांना निलंबित करण्यात आले ते आमदार घटनेत नव्हते. कारण तशी घटनाच घडली नाही. म्हणून एक राजकीय षडयंत्र असून यासाठी १२ नावेच का निवडण्यात आली? ही बारा नावे का ठरवण्यात आली? हीच बारा नावे का घेण्यात आली? त्यासाठी एक वर्षांचा कालावधीच का निश्चित करण्यात आला? कुणाचा दोष नसताना, कोणी ही शिविगाळ केलेली नसतानाही कारवाई का करण्यात आली? या सगळ्यात राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेच्या आमदारांनी शिविगाळ केली त्यांनीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही हे सभागृहात मान्य केले. मग शिवसेनेच्या आमदारांना का निलंबित करण्यात आले नाही? असा सवालही त्यांनी केला.

कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करता शिक्षा घेणारे आम्ही बारा विधानसभा सदस्य असून नैसर्गिक न्यायाला धरुन आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही. ज्या एका घटनेचा पुरावा नाही. कारण घटना घडलीच नाही, त्यामुळे पुरावा असण्याचा प्रश्नच नाही. अशा चेंबरमधील कल्पोकल्पीत घटनेवर ही एवढी मोठी शिक्षा देण्यात आली आहे. म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. म्हणून आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही हा निर्णय घेतला असून आम्ही यातील सत्य न्यायालयासमोर मांडू, आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अशी शिविगाळ, अशी घटना घडली नाही तरीही तुम्हाला तसे वाटत असेल तर मी पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून क्षमा मागेन, असे मी जे विधान केले. माझी आणि भास्कर जाधव यांची गळाभेट झाली हे त्यांनी मान्य केले. पण गळा भेट झाल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरुन त्यांनी गळा कापला? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानाबात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारले असता शेलार म्हणाले की, ज्या पक्षाची ओळखच शिवराळ आणि शिविगाळ अशी आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला लगावला.

गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय?

४७ वर्षे असलेली बंदी उठवून दारु परवाने वाटप करताय आणि १२५ वर्षाहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? याबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्या ऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरीचोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.

गणेशाच्या मुर्तीच्या उंचीवर निर्बंध घालून कोरोना कसा रोखणार आहात? गर्दीचे अन्य नियम आम्हाला मान्य पण घरातील मुर्तीची उंची सरकार ठरवते आहे?  असा सवाल केला.

महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता, कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड संताप, संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेणे आवश्यक आहे. तसे न करता सेना भवनात बैठका का घेतल्या जात आहेत? कसली लपवाछपवी सुरु आहे? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *