मुंबई: प्रतिनिधी
बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात “होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!” नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर मेट्रो कारशेडच्या विषयावरून टीका केली.
ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे ते अपेक्षितच होते. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मिठागर आयुक्तांची एनओसी आपण घेतलेली नाही. या जागेवरील खासगी मालकांचे त्याबाबतचे दावे तुम्ही विचारात घेतलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हे राजकीय दबावापोटी आले आहेत. राजकीय दबावापोटी घेतलेले हे आदेश मागे घेण्याची नामुष्की या सरकारवर आलेली आहे, आणि न्यायालयाने आता जैसे थे ते आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होऊन प्रकल्पाची किंमत वाढणार आहे. ही किंमत वाढल्यामुळे मुंबईकरांवर तिकीटाचा बोजा वाढणार आहे. यासाठी आरे मध्ये कारशेड उभारण्याचा पर्याय उपलब्ध होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत परवानगी दिली होती. 90 टक्के काम पूर्ण होत आले होते, त्यानंतर केवळ हट्टाने पेटून आणि अहंकाराने कांजूरमार्ग येथे कारशेड करण्याचा निर्णय म्हणजे हा बालहट्ट आहे. एकीकडे बाल रंगभूमीवरील बालनाट्य बंद आहेत आणि मुंबईकरांना मंत्रालयाच्या दारात अशी बालनाट्य पहावी लागत आहेत, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
