Breaking News

वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या बाहेर चारी बाजूला मोठ्या व्यवस्था उपलब्ध करणार सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

आषाढी वारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य भरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. या वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असतो. मात्र तरीही वारकऱ्यांमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळे वारकऱ्यांना मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा मिळाव्यात आणि त्यांची तात्पुरती निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर शहराला जोडणाऱ्या चारी बाजूला ३० ते ३५ एकर जमिन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली.

पंढरपूरात आषाढी वारीनिमित्त वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या निमित्ताने आळंदी, देहू, पुणे, शेगाव या भागातून संताच्या पालख्या निघतात. तसेच पालख्यांबरोबर मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी झालेले असतात. या वारकऱ्यांना उपलब्ध सोयी-सुविधांच्या अनुषंगाने सोमवारी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीची माहिती देताना ते बोलत होते.

वारीच्या निमित्ताने आळंदी, देहू येथून संत ज्ञानेश्वर, संत तुकारामाची पालखी तर शेगाव येथून गजानन महाराजांची पालखी निघते. या सर्व पालख्या कात्रज घाट मार्गे पुढे पंढपूरकडे प्रस्थान करत असताना या वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे या वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडतो. तसेच कधी कधी त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून मोठ्या संख्येने असलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरविणे, त्यांच्या आवश्यकतेनुसार मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्यावर्षी राज्यभरातून वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी आणि समस्या भेडसावू नये यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *