Breaking News

अनिल परबांच्या त्या क्लिपची सीबीआय चौकशी करा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते ? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक झालेली नव्हती, त्यापुर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर  दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाबाबत चुकीचा उल्लेख केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्षमायाचना करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नरायण राणे यांच्या अटकेबाबत तसेच या संपूर्ण प्रकरणात आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडेच काढले आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब काल ११ ते १ वाजता रत्नागिरी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत होते त्या दरम्यान एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भात आदेश देत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. या वेळी अनिल परब हे उच्च न्यायालयाने व सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे सांगत आहेत. खरे तर त्यावेळेस राणे यांच्या जामीन अर्जाची सुनावणीच सुरु झाली नव्हती. किंबहुना जामीन अर्जासाठी अर्ज केलेला नव्हता, त्याची प्रक्रिया ही सुरु झालेली नव्हती. त्याबद्दल आधीच ती नाकारली जाणार याबाबत विधान करत आहेत. परब हे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे असे सांगत आहेत. असे वक्तव्य करून परब यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. गृहमंत्री नसतानाही परब यांनी राणे यांच्या अटकेसाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचेही या संवादातून दिसत आहे. अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. कालही हेच अधोरेखित झालं आहे. परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

न्यायालयाचा निवाडा आधीच घोषित करत आहेत याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांना प्रयत्न केला ही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. या संभाषणामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे. म्हणूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे. अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते. त्यामुळे मंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील संभाषणाची चौकशी होण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

राज्यात अलीकडेच मंत्रालया समोर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक व त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशय येत असल्याचे ते म्हणाले.

कालपासून आम्ही जो तमाशा बघतो आहोत तो नारयण राणे यांच्या वाक्याचा राग आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव बाबत जे अज्ञान मुख्यमंत्र्यांचे उघड झाले त्याबद्दलचा हा थयथयाट आहे?  मुख्यमंत्री ज्यावेळी मंत्रालय समोरुन १५ ऑगस्टला महाराष्ट्राला संबोधित करीत होते, त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाविषयी जाहीर कार्यक्रमात चुकीचा उल्लेख केला. असा उल्लेख करणे म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा जाणूनबुजून उपमर्द असल्याने मुख्यमंत्र्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करावी. देशातील स्वातंत्र्य सैनिक, जनता, सैनिक यांचा अपमान केला. हे सारे देशांने पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत मुख्यमंत्री जनतेकडे क्षमायाचना करणार आहेत काय? हे जाणीवपूर्वक केले का? अज्ञानातून घडले का? ही शंका का निर्माण करत आहेत?  हिरक महोत्सव, कि अमृतमहोत्सव याबाबत शंका उपस्थित केली याबाबत स्पष्टीकरण होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरले आहेत. म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचने नुसार भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे स्मरण करून देण्यासाठी ७५ हजार पत्रे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर ही त्यांना स्मरण झाले नाही तर आम्ही गांधीगिरी करुन फुल नाही तर काटे पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार. ॲड आशिष शेलार म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं. कोकणातील आमचे सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्यावेळी ठाकरेंनी तेच केलं. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालं त्यांना अटक केली, कोकणी माणसाला सन्मान मिळाला की उद्धव ठाकरेंच्या पोटात का दुखतं?, असा खोचक सवाल त्यांनी केला.

तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवारांना एका व्यक्तीने दुर्दैवी घटनेत कानशिलात लावलेली देशाने पाहिली, पण त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते आहे? असा टोला लगावत सुरुवात तुम्ही केलीत, शेवट आम्ही करु असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *