Breaking News

रुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : प्रतिनिधी
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली.
२०१४ ते जुलै २०१९ पर्यंत सुमारे ३ लाख ४६ हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील सुमारे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसुतीगृह ठरले असून आतापर्यंत पाच वर्षांत ३३ हजार प्रसुती या रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. त्यामध्ये २०१४ मध्ये २ हजार १००, २०१५ मध्ये ४ हजार २१३, २०१६ मध्ये ६ हजार, २०१७ मध्ये ६ हजार ५८०, २०१८ मध्ये सर्वाधिक ११ हजार १४१ तर ३१ जुलै २०१९ पर्यंत २ हजार ९०० अशा सुमारे ३३ हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *