मुंबई: प्रतिनिधी
नुकतीच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली. मात्र त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेली वेळ ही योग्य नसल्याने या वेळेत बदल करावा अशी इच्छा असून यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सकाळी ७ वाजण्याच्या आधी आणि त्यानंतर दुपारी १२ वाजल्यानंतर तर रात्री ९ नंतर प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. परंतु या नियमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना कार्यालयात पोहोचणे अवघड बनले आहे. त्यामुळे त्यांचे एकप्रकारे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनाही प्रवासाची मुभा देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
त्यानुसार आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
