Breaking News

अपेक्षेप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था वाढलीच नाही ६.५ नव्हे तर ५.७ च्या गतीने अर्थव्यवस्था वाढणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी

यंदाच्यावर्षी राज्याची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने वाढणार असल्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र चालू वर्षासाठीच्या जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ६.५ नव्हे तर ५.७ टक्क्याने वाढणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने तब्बल १.५ टक्क्याने अर्थव्यवस्थेचा गाडा घसरल्याचे स्पष्ट होत आहे.

विधिमंडळात २०१९-२० चा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल आज मांडण्यात आला.

वित्तीय तूट आणि कर्जे

यंदाच्या आर्थिक वर्षात महसूली उत्पन्नात २० हजार कोटी रूपयांची तूट राहणार आहे. तर वित्तीय तूट ६१ हजार ६७० कोटी रूपयांची राहणार आहे. तसेच राज्याच्या डोक्यावर ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रूपयांचे राहणार आहे.

राज्याचे दरडोई उत्पन्न

विद्यमान परिस्थितीत राज्याचे दरडोई उत्पन्न १ लाख ९१ हजार ७३६ कोटी रूपये असून यात आगामी वर्षभरात वाढ होवून २ लाख ७ हजार ७२७ कोटींची वाढ होणे अपेक्षित आहे. तर स्थूल उत्पन्नात २ लाख ४५ हजार ७९१ कोटींची वाढ अपेक्षित आहे.

कृषी उत्पादनात घट आणि वाढीची अपेक्षा  

या अहवालातील माहितीनुसार राज्याच्या कृषी क्षेत्रात गतवर्षी उणे प्रगती दाखविण्यात आली होती. मात्र यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने यात वाढ दाखविण्यात आली आहे. गतवर्षी तृणधान्ये, कडधान्य,फळे, भाजीपाला, एकूण अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली होती. मात्र या उत्पादनात वाढ होणार असल्याचे भाकित करण्यात आले असून कापूस, तेलबिया यांच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी तृणधान्य ९ टक्के, कडधान्ये ३ टक्के, तेलबिया १ टक्के व कापसाच्या उत्पादनात २४ टक्के वाढ अपेक्षित असून ऊसाच्या उत्पादनात ३६ टक्के घट अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृषीक्षेत्रातील घट होण्यामागे अवकाळी पाऊस, नद्यांना आलेला पुर यामुळे ३७ हजार ९८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महागाई-चलनवाढ

याशिवाय राज्यातील चलनवाढीचा अर्थात महागाईचा दरही चांगलाच वाढलेला दिसून येत असून ग्रामीण भागात ९.२ टक्के, तर शहरी भागात हा दर ६.२ टक्के असल्याचे दिसून येत आहे. महागाईचा दर वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

उद्योग-रोजगार निर्मितीत घट

मात्र मागील पाच वर्षात किती उद्योगांनी गुंतवणूक केली, किती उद्योगधंदे राज्यात आले, किती जणांना रोजगार मिळाला याची ठोस आकडेवारी देण्याचे वित्त व नियोजन विभागाने या अहवालात देणे टाळले. मात्र १९९१ ते २०१९ या कालावधीत राज्यात १३ लाख २ हजार ५१८ कोटी रूपयांची गुंतवणूक आल्याचे सांगत १३.२३ लाख तरूणांना रोजगार मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत उद्योगधंदे नसल्याने रोजगाराच्या संख्येत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच गत फडणवीस सरकारने ३० लाख तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यानेच स्टार्ट अप आणि स्वंयरोजगार यासंकल्पनेवर भर दिला आहे. या दोन्ही योजनांसाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी वाढवून दिल्याचे दिसून येत आहे. तसेच स्टार्ट अपमधून रोजगार निर्मिती करणाऱ्यांच्या संख्येतही २ हजार ५८७ हजारावरून ४ हजार ३२४ पर्यंत वाढ झाली आहे.

त्यामुळे यंदाच्या वर्षाचा मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा उद्योग आणि सेवा क्षेत्रावर राहणार असल्याची शक्यता आहे.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *