Breaking News

अजित पवार म्हणाले, काट्याने काटा काढायचा असतो सीताराम गायकर यांच्यासह अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी

वैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं भवितव्य आहे, परंतु काय झालं माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात काटयाने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. राष्ट्रवादीचा आमदार यावा म्हणून प्रयत्न झाला. नगर जिल्हयात चांगली साथ मिळावी. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्हयाने साथ दिली. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतात असेही अजित पवार म्हणाले

विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचं काय? भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज नगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

घटना घडत असतात. कोण जात असतं येत असत. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून आम्हाला संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे सहकाराशी आपलेपणाचे नाते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लहानपणातच सहकाराची जबाबदारी आली होती. पवारसाहेबांनी वसंतदादा यांच्यानंतर सहकाराला आधार दिला हेही त्यांनी स्पष्ट केले.

वेगवेगळ्या प्रकारे मागण्या पूर्ण करण्याचे काम राष्ट्रवादीमय जिल्हा होता म्हणून काम केले. नगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली. कशी व कुणी केली हे मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊ दे नंतर बघतो एकेकाला असा सज्जड दमही अजित पवार यांनी यावेळी भरला.

आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय – जयंत पाटील

आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

गायकर पक्षातून गेले होते असं कधी जाणवलं नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात अशा अविर्भावात प्रवेश केला आहात. शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी करताच एकच हशा पिकला… कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते याची आठवणही त्यांनी सांगितली.

पिचड यांनी पक्ष सोडला त्यामुळे आम्हाला नवा कार्यकर्ता मिळाला आणि किरण लहामटे निवडून आले. पश्चिम घाट योजनेचा फायदा अकोलेला होणार आहे. बंधारे बांधण्याचे काम करत आहोत. भाजपच्या काळात आंदोलन करुनही कामे झाली नाहीत ती कामे किरण लहामटे आमदार झाल्यावर करत आहेत. आपल्या घरात आला आहात. गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुका मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगर जिल्हयात कॅनालची भरपाई खूप दिली आहे. आता अकोले विकासासाठी कटिबद्ध आहोतच परंतु नगर जिल्हाही महत्वाचा आहे. नगर जिल्हयात आता ताकद आणखी वाढणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा असे जयंत पाटील यांनी सांगतानाच पिचड यांच्यावर काय अन्याय झाला अशी विचारणा केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. आपल्यातील जीवाभावाचा नेता येतोय त्यामुळे आनंद वाटला आहे.त्यांच्या पाठिशी ताकदीने उभा राहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही ते म्हणाले.

पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही. तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत राष्ट्रवादीत पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केले.

आमदार डॉ किरण लहामटे, सिताराम गायकर यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाळासाहेब पाटील, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते. सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालकांनी आणि अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ७२ दिग्गज पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *