Breaking News

आशिष शेलारांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर मी कधीही अशा गोष्टीला महत्व देत नाही

पुणे: प्रतिनिधी

आज त्यांचे सरकार नाही ही त्यांची खंत आहे. त्यांचे दुखणे इतकं मोठे आहे की त्यावर दुसरं काहीही न करता गरळ ओकायची सवय लागली आहे. त्यामुळे मी कधीही त्या गोष्टीला महत्व देत नाही असं सांगत आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू असलेले वाद पाहाता राज्यात कधीही निवडणुका लागू शकतील असे भाकित भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वर्तवत महाविकास आघाडी म्हणजे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याची टीका त्यांनी केली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.

आशिष शेलार आज मावळ दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका करत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल या शब्दात टीका केली. शेलारांच्या या विधानावर अजित पवार यांनी पलटवार केला. माझा सिंहगड, माझं अभियान या मोहिमेचा शुभारंभ आज सिंहगडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

आपल्याला जी संधी जनतेनं दिली आहे, त्यातून प्रश्न सुटावेत आणि आपल्याला आपली मुदत संपल्यानंतर प्रश्न मार्गी लावल्याचं समाधान मिळावं अशी इच्छा असल्याचे देखील ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची देखील आठवण करून देत तेव्हा तुझ्या जबड्यात हात घालू, कोथळा काढू, वाघ-सिंह प्राण्यांची भरपूर आठवण काढली होती. तो निवडणुकांचा काळ होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की निवडणुकीत असं बोलायचं असतं आणि विसरून जायचं असते. आताही ती पद्धत त्यांनी ठेवली आहे. आम्ही काही वाघ-सिंह करणार नाही. उद्धव ठाकरेही समंजस आहेत आणि आम्ही सगळे देखील एकमेकांना समजून घेऊ असे सांगत महाविकास आघाडातील विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपाच्या आशिष शेलार यांना आता दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच उत्तर दिल्याने महाविकास आघाडीतील विसंवाद आणि मध्यावधी निवडणूकांची शक्यता दोन्ही फेटाळून लावली गेल्याचे दिसून येत आहे.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *