Breaking News

चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर मुनगंटीवार हे सारखे म्हणायचे की, आमची चूक झालीय चूक झालीय मात्र आता चुकीला माफी नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पहात म्हणाले.  अजित पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देत होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. त्यावेळच्या सरकारने १६०० कोटी रूपयांचा निधी ग्रामविकास विभागाला विकास कामांसाठी दिला. मात्र ते सरकार गेले आणि तुमचे सरकार आले. या सरकारने येताच या १६०० कोटी रूपयांपैकी १४०० कोटी रूपयांच्या निधीला स्थगिती दिल्याची आठवण करून देत पुन्हा असे वागू नका असा उपरोधिक सल्लाही देत सासूचे चार दिवस असले तर सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस तुम्ही अर्थसंकल्प मांडल्यावर म्हणालात की दादांचा अर्थसंकल्प नाही तर जाहीर सभेतील भाषण आहे. तुम्ही जाहीर सभेत गेल्यावर काय करता लोकांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या मनाला पटतील अशा घोषणा करता, त्यांच्यासाठी नवनवीन योजना जाहीर करता तसेच मी अर्थसंकल्पातून केलंय. त्यामुळे अर्थसंकल्प सगळ्यांना आपला वाटत असल्याचे सांगत फडणवीस यांच्या टीकेला प्रतित्तुर दिले.

सुधीर मुनगंटीवार महाराजांनी आम्ही जेवढा आमच्या जाहीरनाम्याचा अभ्यास केला नसेल त्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय. मात्र ते सारखे म्हणायचे आमची चुक झाली, आमची चुक झाली मात्र आता चुकीला माफी नाही असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे टाळीसाठी हात पुढे केला. मात्र मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी अजित पवारांच्या या वाक्याला हासून दाद दिली.

आता आमचे सरकार होणार आता आमचे सरकार होणार असे म्हणत तुम्हाला तिकडेच पाच वर्षे थांबावे लागणार असून या कालावधीत तुमच्या मागे बसलेले अनेकजण तिकडचे इकडे येतील असा विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेते फडणवीस यांना इशारा दिला.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपातील काही सदस्यांनी म्हणून तुम्ही तिकडून इकडे आला होतात का असा सवाल केला. तोच धागा पकडत अजित पवार यांनी तिकडून इकडे आलो तरी इथेही मजबूत बसलोय असे सांगत या सरकारमध्येही आपले स्थान पक्के असल्याचे त्यांनी विरोधकांना ठासून सांगितले.

शिवभोजन थाळीच्या अनुषंगाने सुधीर (मुनगंटीवार) महाराजांनी आमच्या जाहीरनाम्याचा चांगला अभ्यास केला. मात्र काही दिवसांपूर्वी काही मोठ-मोठी माणसे जाहीरनामे हे फक्त निवडणूकीसाठी असल्याचे सांगत त्याला गांभीर्याने घ्यायचे नसतात असे स्पष्ट केले होते. त्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या  आश्वासनाप्रमाणे १५ लाख खात्यात जमा होणार होते किती जणांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले असा उपरोधिक सवाल भाजपाचे नाव न घेता केला. त्यावर भाजपाच्या सदस्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिकचे बोलण्याचे त्यांनी टाळले.

Check Also

२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *