बुलढाण्याच्या खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शिवणी अरमाळ भागाला पाणी द्यावे यासाठी लढा उभारणारे कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी सूसाईड नोट लिहिली होती. त्यात शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सूसाईड नोटमध्ये लिहिले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कैलास नागरे यांना युवा शेतकरी पुरस्काराने गौरवले होते.
शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात ७ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनाची पुर्तता न केल्याने २६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका कैलास नागरे यांनी घेतली. मात्र यावेळी बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र दोन महिने झाले तरी शासनाकडून कोणतीही हालचाल किंवा ठोस भूमिका न घेतल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत कैलास नागरे यांनी शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल खंत व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी जोपर्यंत कैलास नागरे यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
पाण्यासाठी कैलास नागरे यांची चार पानी सूसाईड नोट
युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तब्बल साडेचार पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटेमध्ये विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. कैलास नागरे सूसाईड नोट मध्ये म्हणाले की, आमच्याकडे सिंचनाच्या सुविधा नाहीत, पण पाणीही नाही. खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. माझ्यावर केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा, राख आनंदस्वामी धरणात टाका, रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका असे आवाहन करत सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्विकारावे असे आवाहन करत मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी कमी पडलो, स्वतः शुन्य झालो, अन् मुलं, बाब, बायको यांनाही शून्य करून जातोय असे आवाहन सूसाइड नोटच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांना केलं.