Breaking News

शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे

भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात शरद पवार हे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहकार क्षेत्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे.
तसेच भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा खोत देशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक आणि गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि.धावरवाडी ता.कराड जि.सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता.पलूस जि.सांगली, कै.कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता.दौंड, जि.पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता.कागल जि.कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल अशा विविध अहवालांचे प्रकाशन करण्यात आले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *