Breaking News

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बँकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

कर्जमुक्ती योजना २०१९ चा ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटींचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणिकरण झालेल्या ३२.२९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर काही बॅंकांचे राष्ट्रीयकृत बॅंकांत विलिनीकरण झाल्यामुळे अडचणी आल्याचे सांगून या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही तालुक्यातून बोगस प्रकरणे झाली नाहीत असे निदर्शनास आलेले आहे. असे स्पष्ट करुन पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व २०१९ साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या. परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनामधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. नियमित भरणा करणा-या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा केली होती. तसेच ज्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचाही पर्याय दिला होता. यातूनही काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबद्दल काही तक्रारी नाहीत आणि या कर्जमाफी योजनेचे उदिष्ट्य सरकार पूर्ण करेल असे उत्तर दिले.

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाची मिळणार नुकसान भरपाई चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार

राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *