Breaking News

आधारभूत किंमतीनुसार हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत ५०.८४ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी दि. १७ मे २०२२ पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चणा खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे सुधाकर तेलंग, द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी, विदर्भ ॲग्रीकल्चर अलाईड प्रोड्युसर कंपनी नागपूर, नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, वखार महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना चणा खरेदीसाठीच्या नोंदणीची तारीख वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या. चणा खरेदीचे उद्दीष्ट ६.८९ लाख मेट्रिक टन असून, ते पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात यावेत. धान्याची साठवणूक योग्यरितीने करण्यासाठी प्रयत्न करावेत पावसामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या धान खरेदीची किंमत वेळेत अदा करण्यात यावी. याचप्रमाणे हमालीचेही पैसे वेळेत अदा करण्यात येतील यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील धान खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हरभरा ५२३० प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येत असून, १ मार्च पासून ७३० केंद्रांवर खरेदी करण्यात येत आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *