Breaking News

अजित पवार म्हणाले; गोवंश संवर्धनाचे काम करा, आवश्यक निधी देणार देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्यावतीने २७ ते २९ मे या कालावधीत आयोजित गोवंश-२०२२ प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरू आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे, यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

गोवंश जपून शेतकरी समृद्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य
आपल्या संस्कृतीत देशी गाईला अन्यन्यसाधारण महत्व आहे. देशी गायींचे गोमुत्र, शेण, सेंद्रिय खत, तुप, दुध, खवा यांनाही वेगळे महत्व आहे. आरोग्याच्यादृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक ठरतात, शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.

दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही महत्त्वाचे आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन होते, या केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्राला भेट द्यावी. देशी गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाबाबत चांगल्या जाती, त्यांचे वैशिष्ट्य तसेच नवीन संशोधन याबाबत माहिती मिळणार आहे, शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत देशी गोवंश संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. यावेळी पशुपालक शेतकरी गोशाळांचे पदाधिकारी,पशुतज्ज्ञ, डेअरी संस्थांचे प्रतिनिधी तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

गोधनाची माहिती देणारे प्रदर्शन
गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीतील गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.

त्यासोबतच देशी गाईंचे संगोपन, व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती आणि प्रात्यक्षिके, पशुखाद्य निर्मिती तंत्र आणि यंत्राचे प्रात्यक्षिक, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यंत्रणा तसेच विक्री तंत्राची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हंगामी, बहुवार्षिक चारा लागवड प्रक्षेत्र भेट, मुरघास निर्मिती तंत्र आणि यंत्रांचे प्रात्यक्षिक, शेण, गोमूत्र स्लरी जैविक मिश्रण, गोखर खत, व्हर्मिवॉश, गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिके, शेणापासून मूल्यवर्धन, कुंड्या, पणती, मूर्ती,

भेटवस्तू निर्मिती, बायोगॅस संयंत्राचे प्रकार आणि गॅस निर्मिती तंत्र, सौरऊर्जा वापराचे तंत्र याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि यंत्रेदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्र्याकडून गोवंश प्रदर्शनाची पाहणी आणि संवाद
सकाळी साडेसातच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच उपमुख्यमंत्री पवार प्रदर्शनस्थळी पोहचले. देशी गाईंच्या गोठा व्यवस्थापनातील बारकावे, जनावरांचे औषधोपचार, जैव मिश्रण, देशी गाईंच्या शेणखताचा उपयोग, गोमुत्राचा उपयोग, व्हमिवॉश तसेच दुग्धव्यवसायाच्या तसेच गोसंवर्धनाच्या संदर्भातील बारकाव्याबाबत त्यांनी संबंधितांना प्रश्न विचारले. ट्रॅक्टर संचलित मुरघास यंत्र, आजारी असताना जनावरे उचलणी यंत्र तसेच नवीन अवजारांचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.
दुधापासून पदार्थ तयार करण्यात येत असलेल्या विभागाचीही त्यांनी पाहणी केली.

मजूर महिलांची विचारपूस
चाराकापणीचे काम करणाऱ्या छबुबाई कामठे यांच्याशी संवाद साधला. चाराकापणीचे काम कसे चालते, चारा किती दिवस टिकतो, वेतन किती मिळते, पेन्शन अशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर मजूर महिलांचीही विचारपूस केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी आवर्जुन साधलेल्या संवादाबद्दल या महिलांनी आनंद व्यक्त केला.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *