Breaking News

कृषी योजनांचा लाभ घ्यायचाय मग या तारखेपर्यत अर्ज करा महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज ३१ डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.  शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली  असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये  शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *