Breaking News

एसटी कर्मचारी संपप्रश्नी पवारांच्या भेटीनंतर परब-पडळकर बैठक, पण निर्णय? दोनवेळा चर्चा करूनही बैठक निष्फळ: पुन्हा उद्या होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी

मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या मिटविण्याच्यादृष्टीने आज हालचाली सुरु झाल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब यांच्या भेटीला एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आले. दिवसभरात दोनवेळा चर्चेच्या फैरी झडल्या.

या बैठकीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांना याप्रश्नी विचारले असता ते म्हणाले की, मंत्र्यांबरोबर चर्चा झाली. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. यात काही आता तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आहेत. यासंदर्भात आता आझाद मैदानावर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांशी बोलणार आहे. त्यानंतर यासंदर्भात उद्या पुन्हा चर्चेला येणार आहे.

तर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समिती जो काही अहवाल सादर करेल तो अहवाल राज्य सरकारकडून मान्य केला जाईल. जर समितीने विलनीकरणाचा प्रस्ताव दिला तर त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करून निर्णय घेणार घेईल. तसेच चर्चेसाठी आज एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे संपाच्या अनुषंगाने चर्चा झाली नाही. मात्र जे तात्रिक मुद्दे आहेत. त्याची कल्पना त्यांना दिली. माझ्यासाठी एसटी परिवार महत्वाचा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन केले.

जर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला तर त्यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यास एसटी प्रशासनाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजही शरद पवार यांची मंत्री अनिल परब यांनी भेट घेतल्याने काही गोष्टींच्या सूचना पवारांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच निर्णय झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचा संप मागे नाही अशी भूमिका घेणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे परिवहन मंत्र्यांच्या भेटीला आले. या परब आणि पडळकरांमध्ये दोनवेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत पडळकर आणि परब यांच्या एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *