Breaking News

आमचे पोलिस काय करत होते? भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत येऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जान मोहम्मद शेख याला अटक केल्याच्या घटनेनंतर भाजपाने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांवर निशाणा साधत हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण पाकिस्तानात झालं असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता असा गौप्यस्फोट शेलार यांनी करत नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीत अटक केली. हिंदूंच्या सणांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना दाऊदचा छोटा भाऊ अनिस अहमद पैसा पुरवत होता. यांचं प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होतं. दिल्लीहून येऊन विशेष पथकानं त्यांना अटक केली. अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असं म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलिस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते? याची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? होती तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण तर नाही ना? असा सवाल करत पोलिस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.

जेव्हा पोलिसांचं लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात घालायला लावतात, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं हे आपल्याला दिसतेय. कुठे संपादकाला अटक कर, कुठल्या आमदारावर लुकआऊट नोटीस काढ, केंद्रीय मंत्र्याला अटक कर यामध्ये राजकीय दबावामुळे पोलिसांना लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे गंभीर विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, या गंभीर विषयावर एका अर्थाने राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि इतर मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत अजून अशी काही लोकं राज्यात लपली आहेत का? याबाबतीतली चौकशी वाढवावी असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *