Breaking News

पुनावाला म्हणतात, रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही लस पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पुनावाला यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी

लसींचा पुरवठा करण्यावरून एका राजकिय पक्षाच्या नेत्याकडून धमकीचा फोन आल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी करताच यावरून एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर विविध राजकिय पक्षांनी पुनावाला यांना कोणी फोन केला याचा खुलासा करण्याची मागणी करण्यास सुरु झाली. अखेर याप्रश्नी आपले मौन सोडत रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे शक्य नसल्याचे सांगत लस पुरवठा लगेच शक्य नसल्याचे अदार पुनावाला यांनी स्पष्ट करत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे या गदारोळावर पडदा टाकला.

सद्यपरिस्थितीत केंद्र सरकारने आपल्याकडे २६ कोटी लसींची मागणी नोंदविली असून त्यापैकी १५ कोटीहून अधिक लसींचा साठा केंद्राला पुरवठा करण्यात आला आहे. तसेच पुढील ११ कोटी लसींच्या पुरवठ्या संदर्भात १७३२.५० कोटी रूपये केंद्र सरकारकडून आगाऊ रक्कम आपल्याला देण्यात आली असून पुढील काही महिन्यात या लसींचा पुरवठा केंद्राला करण्यात येणार आहे. याशिवाय  पुढील काही महिन्यात अन्य ११ कोटी लस विविध राज्यांना आणि खाजगी रूग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसींच्या निर्मितीची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यामुळे या लसींचे रात्रीत उत्पादन वाढविता येणे शक्य होणार नाही. भारतातील लोकसंख्येचा विचार करता वयात आलेल्या सर्व व्यक्तींसाठी लस निर्मिती करणे हे सहजशक्य नाही. अशाच पध्दतीची अडचण जगभरातील इतर देशांतील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला लस तातडीने उपलब्ध व्हावी असे प्रत्येकाला वाटत आहे. त्यानुसार आम्ही लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असून भारताच्या कोरोना विरोधी लढ्याला आम्ही लस उपलब्ध करून देवून सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

 

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *