Breaking News

संजय नार्वेकर ‘न.स.ते. उद्योग’ बाहेर स्वत:हून केला मालिकेला रामराम

मुंबई : प्रतिनिधी

टीआरपी नसल्याने एखाद्या मालिकेत बदल केले जाणे, लीप घेत नव्या कलाकारांची एंट्री होणे किंवा मालिकाच बंद होणे हे प्रकार आता नवीन नाहीत. असं घडल्यावर बऱ्याचदा निर्मिती संस्थेकडून किंवा कलाकारांकडून एकमेकांवर आरोप केले जातात. संजय नार्वेकरच्या सूत्रसंचालनाखाली झी टॅाकीजवर सुरू असलेला ‘न.स.ते. उद्योग’ हा शो देखील आजपासून नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा टीआरपी घसरल्याने संजयला डच्चू देऊन नवीन टीम आणण्यात आल्याची सध्या जोरात सुरू आहे. पण तसं काहीच नसून आपण स्वत:च ‘न.स.ते. उद्योग’ला रामराम केल्याचं ‘मराठी e बातम्या’शी खास बातचित करताना सांगत संजयने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत संजयच्या सूत्रसंचालनाखाली ‘न.स.ते. उद्योग’ हा विनोदी शो मोठ्या थाटात सुरू करण्यात आला. पण आता संजयच या शोमधून बाहेर पडला आहे. याबाबत सविस्तरपणे बोलताना संजय म्हणाला की, ‘न.स.ते. उद्योग’ या शोची कन्सेप्ट मला खूप आवडली. काहीतरी वेगळं करायला मिळणार असल्याने मी हा शो करायला होकार दिला. मी एखादा उद्योग सुरू करतो आणि नंतर त्याचे कसे बारा वाजतात हे विनोदी पद्धतीने या शोमध्ये दाखवलं जायचं. या निमित्ताने वर्तमान सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केलं जायचं. त्यातून एक संदेशही दिला जायचा, पण हळूहळू या शोचं स्वरूप बदलत गेलं. सिनेमांचं प्रमोशन सुरू केल्याने ‘न.स.ते. उद्योग’च्या मूळ संकल्पनेलाच फटका बसला. सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने मला या शोमध्ये मुलाखती घ्याव्या लागायच्या, पण मला काही त्यात समाधान मिळत नव्हतं. मी एक कलाकार असलो तरी मलाही काही मर्यादा आहेत. एखाद्याची मुलाखत घेण्याची कला माझ्याकडे नाही. यापूर्वी मी कधी तसं काम केलेलंही नसल्याने मला अनइझी वाटत होतं. त्यामुळे पूर्ण विचारानिशी मी निर्माते आणि झी टॅाकीजच्या टिमशी चर्चा केली. ‘न.स.ते. उद्योग’ सोडण्याचा विचार करीत असल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांनाही ते पटलं आणि नवीन टीमसोबत हा शो सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झालं. टीआरपीचा खेळ मला समजत नाही. त्यामुळे यावर बोलणं ठीक नसल्याचंही संजय म्हणाला.

छोट्या पडद्यावरील शो किंवा मालिकांमध्ये काम करताना टीआरपीचा दबाव सर्वांवरच असतो. ‘न.स.ते. उद्योग’च्या टीआरपीबाबत संजय जरी काही बोलत नसला तरी मागील काही दिवसांपासून या शोला टीआरपीचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. पण संजयने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वच पातळीवरून कौतुक होत आहे. मालिका-शो बंद झाल्यावर किंवा त्यात इतर कलाकारांची एंट्री झाल्यावर एकमेकांवर आरोप करण्यात काहीच तथ्य नसतं. याउलट संजयसारखा चांगुलपणा दाखवत सत्य परिस्थिती मान्य करणं गरजेचं आहे. मागच्या महिन्यात ‘न.स.ते. उद्योग’चा शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर संजय सध्या नव्या नाटकाचं वाचन करण्यात व्यग्र आहे. त्यामुळे संजय जरी छोट्या पडद्यावरून गायब झाला असला तरी रंगभूमीवर पुन्हा नव्या रूपात दर्शन देण्याच्या तयारीत आहे.

आता संजयच्या जागी प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर यांनी ‘न.स.ते. उद्योग’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या जोडीला अंशुमन विचारे, नम्रता आवटे, प्रभाकर मोरे, जयवंत भालेराव हे कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. बदलानंतर सुरू झालेल्या ‘न.स.ते. उद्योग’च्या पहिल्या म्हणजे आजच्या भागात झी स्टुडिओच्या ‘गुलाबजाम’ या चित्रपटाची टिम प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. यात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा प्रामुख्याने समावेश असेल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *