Breaking News

अखेर अनेक वर्षानंतर चार आदिवासी पाडे सोलर दिव्यांमुळे झाले प्रकाशमय वणीचा, चाफ्याचा, केल्टी पाडा येथे बायोटॉयलेटची व्यवस्था

मुंबई : प्रतिनिधी

मागील अनेक वर्षापासून आरे कॉलनीतील आदीवासी पाड्यांमध्ये वीज, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत होती. यावर अनेक वेळा विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नातून या चार आदिवासी पाड्यांच्या परिसरात तब्बल २७ सोलर दिवे, तीन आदिवासी पाड्यांमध्ये तीन बायोटॉयलेट आणि पाण्याच्या पाईपलाईनसाठीही पैसे भरल्याने या भागात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरेतील केल्टीपाडा १ व २, चाफ्याचा पाडा, दामुपाडा हा भाग जंगलाला लागून असल्याने येथील आदिवासी रहिवाशांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या भागातील जनतेला पाणी, वीज तसेच शौचालय सारख्या मुलभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. परंतु हरित लवादाच्या आदेशामुळे राज्य शासनाकडून आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने येथील आदिवासी जनता मुलभुत सोयी-सुविधांपासून वंचित रहात होती. येथील जनतेला मुलभूत सोयी सुविधा देता याव्यात यासाठी वायकर यांनी माननीय राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या समवेत अनेक वेळा बैठकाही घेतल्या. परंतु अद्याप त्यांना या कामासाठी आरे प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही.

अखेर शासकीय परवानगीची वाट न पाहता गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी पुढाकार घेत केल्टीपाडा १ व २, चाफ्याचा पाडा, दामुपाडा येथील बिबट्याच्या हल्ल्यापासून आदिवासींची सुटका करण्यासाठी या पाड्यांमधील जनतेच्या मागणीनुसार २७ ठिकाणी सोलर दिवे बसविण्यात आले.

येथील रहिवाशांसाठीची शौचालये घरापासून लांब असल्याने बर्‍याचवेळा बिबट्याच्या हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे जनतेच्या मागणीनुसार वणीचा पाडा, केल्टीपाडा तसेच चाफ्याचा पाड्यातील रहिवाशांना घराच्या जवळच बायो टॉयलेट बसवून देण्यात आले. त्याचबरोबर या पाड्यांमधील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठीही पाईपलाईन पुरविण्यासाठी वैयक्तिक रित्या पाण्याच्या लाईनचे पैसे भरण्यात आल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी सांगितले.

Check Also

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *