Breaking News

आमीर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चा ७०० वा प्रयोग ! २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह मध्ये होणार सादर

मुंबई : प्रतिनिधी

शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.

सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांनी हा प्रयोग आयोजित केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक २०१२ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतरच्या सहा वर्षांत या नाटकानं ७०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचं आहे. या नाटकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून कशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, या स्फोटक विषयावर अतिशय संयत आणि विचारपूर्वक भाष्य केलं आहे.

कोणत्याही नाटकाचे ७०० प्रयोग होणं ही आनंदाची घटना आहे. आमच्या टीमनं केलेल्या कष्टांची ही परिणिती आहे. या ७०० व्या प्रयोगाला आमीर खान आणि नागराज मंजुळे यांच्यासारखे संवेदनशील कलाकार उपस्थित राहणार आहेत, याचा विशेष आनंद होत असल्याचं निर्माता भगवान मेदनकर यांनी सांगितलं.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *