मुंबई : प्रतिनिधी
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. याबाबत लोकहितवादी मंडळातील काही सदस्यांनी आपली भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आपण कळविले होते. त्यानंतर आज साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.
नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ तसेच नाशिककरांच्यावतीने देशभरातून आलेल्या साहित्यिकांचा योग्य असा मान सन्मान ठेवला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
