मुंबईः प्रतिनिधी
राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात महसूल विभागात ३ कर्मचारी आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा आज २३ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर शिक्षण विभागातील १२ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महसूल विभागात आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये २ उपसचिव, ४ अव्वर सचिव, ३ कक्ष अधिकारी, ४ सहाय्यक कक्ष अधिकारी आणि ७ ते ८ कारकून असे मिळून २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जणांचे अहवाल अद्याप वरिष्ठांकडे येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापैकी एका कर्मचाऱ्यांला आयसीयुत शिफ्ट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तर शिक्षण विभागातील १२ जणांमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल सकारात्मक आल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.
मंत्रालयात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीही बाधित रूग्ण आढळून यायचे मात्र त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नसायची. परंतु आज इतक्या जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
बाधित झालेले सर्व कर्मचारी हे मागील आठवड्यातील गुरूवारपर्यंत कार्यालयात हजर होते. मात्र शुक्रवार पासून अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवायला लागल्या. त्यामुळे काही जणांनी शनिवारी तर काही जणांनी रविवारी कोरोनाची चाचणी केली. त्या चाचण्यांचे अहवाल आज सकाळपासून प्राप्त व्हायला लागल्यानंतर ही माहिती पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
