Breaking News

१० वी, १२ वीच्या परिक्षेसाठी मंत्री गायकवाड यांनी केल्या या घोषणा प्रात्यक्षिक परिक्षा होणार लेखीनंतर: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनामुळे सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव कमी झाला असल्याने यंदाच्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षेचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. मात्र या परिक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत त्या पुढे म्हणाल्या की, यापूर्वी १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांचे परिक्षा नंबर ते शिक्षण घेतलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोडून इतरत्र येत होते. मात्र यंदाच्या वर्षी असे होणार नसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांमध्येच त्यांच्या परिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवास करावा लागणार नाही.

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

याचबरोबर, लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एकूण साडेतीन तासाचा वेळ मिळणार आहे. तसेच, प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल)परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार असून या प्रात्यक्षिक परिक्षा या गृहपाठ पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

परिक्षा काळात कोरोना झालेल्या विद्यार्थ्याची परिक्षा पुन्हा घेणार

१० वी आणि १२ वी परिक्षेच्या तारखा जाहिर झालेल्या आहेत. मात्र या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्यास कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास झालेला असेल, लॉकडाऊन किंवा संचारबंदी लागू केल्यामुळे परिक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा जून महिन्यात परिक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सदरच्या परिक्षा कालवधीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तर शहरी भागात ठराविक ठिकाणी या परिक्षा निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरवणी परिक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

परिक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी पुरवणी परिक्षा अर्थात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. तसेच या परिक्षेची केंद्रे शहर व ग्रामीण भागात ठराविक ठिकाणी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *