Breaking News

ऑनलाईन क्लास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

चंद्या लहानपणापासून मुंबईत राहतो बापाने रूम  विकली आणि दोन पोरांची लग्न लावून दिली. दोन मुलं वेगवेगळी राहायला लागली. पोरांना रूम घ्यायला थोडी मदत केली, एक प्रायव्हेट कंपनी आणि एक बीएमसीत सफाई कामगार म्हणून चंद्याला चिपकावलं. चंद्याला पहिली मुलगी झाली तीच श्रुती नाव ठेवलं, दुसरीही मुलगी झाली. चंद्या मात्र या पोरींवर नाराज झाला, म्हणून शेवटचा चान्स घेऊन मुलगा झाल्याझाल्या चंद्याला अख्खी झोपडपट्टी पायदळी तुडवल्यागत झाली. चंद्या विक्रोळीत राहायचा दहा बाय दहापेक्षा एकदम छोटी रूम. रात्री जर एका कुशीवर झोपलं तर सकाळी त्याच कुशीवर उठायचं एवढी छोटी झोपडी. चंद्या शिक्षणा बाबतीत मुलांना मात्र हवं नको ते द्यायचा. मोठी मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार. लॉकडाऊन झालं त्यानंतर एक महिना पोरं घरातच डाम्बवुन राहिलेली म्हणून चंद्याने आपल्या तिन्ही पोरांना गावाला पाठवलं.

श्रुती आठवीतून नववीत गेली आणि कळलं की, ऑनलाईन क्लास सुरु  होणार आहेत. आणि ऑनलाईन क्लास हे लॉकडाऊन मधला वेगळाच प्रकार कानावर सगळ्यांच्याच पडला. त्यासाठी स्मार्ट फोन हवा स्मार्ट फोन बरोबरच नेट हवं. गावाकडून येणाऱ्या फोनमुळे चंद्याने शेवटी मुंबईतून एक फोन  पाठवून दिला. गावाला फोन आल्या आल्या श्रुतीला वाटलं की आता आपला क्लास खऱ्या अर्थाने सुरु होणार. दोन दिवस फोन नेमका कसा असतो हे समजण्यातच गेला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे लाईट गेली.  ते काही दहा दिवस येण्याची शक्यता नाही असं सांगून गेले. वादळात लाईटीचे पोल बऱ्यापैकी आडवे झालेले. याचं आठवड्यातले तीन क्लास तिचे बुडणार होते. जवळ जवळ बारा दिवसांनी लाईट गावांत आली. सगळ्यांनी पहिले मोबाईल चार्जिंगला लावले. लाईट आली सगळं काही सुरु झालं. पण नेट काही केल्या घरात मिळेना ते गावदेवीच्या टेकडीशीच फोरजी नेटवर्क  मिळे. वॉट्सअपला मेसेज जातील इतपत घरात नेटवर्क मिळे. पण ऑनलाईन क्लासला जितकं हवं तितकं मिळेना. त्यात पावसाळचे दिवस टेकडीशी रान झालेलं शेवटी श्रुतीच्या चुलत्याने रस्ता साफ  करून दिला आणि एक झोपडी काढून दिली. तरी कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होई. कधी लाईट नाही म्हणून मोबाईल बंद राही. काही ना काही प्रॉब्लेम चालूच राही. गावात शिकणारी पोरं बिंधास्त होती ना ऑनलाईन क्लास ना काही मास्तर पंधरा दिवसाचा एकदाच अभ्यास देऊन जायचा. सरकारी शाळांची अवस्था तर अशी झालीय की पोरं पाचवी पर्यंत गेली तरी धड मराठी नीट वाचता येईना, इंग्लिश तर दूरची गोष्ट. श्रुतीचं आपलं आता नेहमी नेहमी क्लास सुरु झाला नेहमी सोबत येणारी पोरंही आता तिच्यासोबत येईनाशी झाली. तिला एकटीला भीती वाटत असे तरीही जाई. एकदिवस क्लास संपायला अंधार झाला तरी पोरगी आली नाही म्हणून चुलता पाहायला बॅटरी घेऊन गेला पाहतो तर काय श्रुती आडवी पडलेली बेशुद्ध अवस्थेत. त्याने पाहयला आणि एकदम दरदरून घाम फुटला

तशीच उचलून तिला वाडीत आणली. लोकांनी पाहिलं तर पायावर दोन डाग दिसले. सख्या कांबळ्या जोरात वरडला “आर  रांडाच्यानो जनावरं डसलाय ” वीराजची गाडी बघा कोण तरी बोलला तो बाराशे रुपये घेल. श्रुतीचा चुलता बोलला बचत गटातन पैशेद्या पोरीचा जीव वाचायला पाहिजे. चांद्याला कळवलं चंद्या मुंबई वरण यायला निघाला खरा पण दहा दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार हे या सगळ्या गडबडीत निर्णय घेतला गेला. पोरीची केस कोणी डॉक्टर घेईना शेवटी जिल्ह्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये श्रुतीला ठेवलं गेलं. उपचार चालु केल्यावर दोन दिवसाने श्रुतीने डोळे उघडले नीटस बोलता येईना. क्लास क्लास एवढंच बोलली आणि माझा मोबाईल.      एवढ्या सगळ्या धावपळीत श्रुतीचा फोन कुठे पडला कोणी उचलला हे कोणाच्याच लक्षात आल नाही.

चंद्याच्या फोनवर शिक्षकांचा फोन आला, “तुम्ही जबाबदार  पालक नाहीत आज आठवडा झाला. क्लास अटेंड केला नाही सरकारने शाळा खोलल्या नाहीत म्हणून तुम्हाला ही सोय उपलब्ध करून दिली. तरी तुम्हाला मस्ती आलेली आहे “.

चंद्याने काहीही न बोलता फोन ठेवला. चंद्याच्या दहा दिवस आधी प्रणय मुंबईहुन आला होता. चंद्याला बोलता बोलता बोलला. माझ्या पोरींना मी घरात रावंटर लावलाय मस्त रेंज हाय, चांगला प्रत्येकाला एक एक स्मार्ट फोन दिलाय तू पण रावटर लावून घे. चांद्याने हो म्हणून मान हलवली. मनाशीच म्हणाला “राज्या तुमचं ठीक आहे, मिडल क्लास वाल्याचं. हित भाकरी शोधता शोधता आखा दिवस जातोय नेट कुठच्या येळात शोधायचं रं, हीत सरकारनं आमच्या बरोबरच आमच्या  पोरांची  पण मारलीय म्हणजे धड दाखवताही येईना आन झाकता ही येईना अशी अवस्था करून टाकलेय. चंद्या सरळ उठून आत खोलीत गेला प्रधानमंत्र्याच्या कर्कश आवाजातलं भाषण बंद केलं आणि खोलीत जाऊन आडवा पडला.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *