Breaking News

पर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा

हऱ्याला पर्मनंट होऊन फक्त पाच वर्ष झाली होती. जेंव्हा पर्मनंट झाला, तेंव्हा पर्मनंट नोकरदार म्हणून तो एकटाच होता. लग्न व्हायच्या आधी नोकरीला लागला आणि पर्मनंट झाल्या झाल्या लगेच मुली बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा मुलींना पर्मनंट नोकरदार म्हणून नवरा हवा तसा होताच, पण हऱ्या दिसायला काळा सावळा आणि उंचीला थोडा कमी होता. त्यामुळे एकतर कधी कधी चांगल्या मुली नाही म्हणत किंवा कधी कधी हाच पोरगी सुंदर नाही म्हणून पोरींना रिजेक्ट करे. शेवटी पोरगी सापडली मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. गावचा बामण केशा हऱ्याकडं आला म्हणाला माझ्या शशीला पण चांगल्या नोकरीत चिकटवून टाक काय असलं तो तुझा घेऊन  टाक. शेवटी लाखभर रुपये घेऊन हऱ्याने शशीला आपल्या ऑफिसात चिपकावला. पण त्याच्यापेक्षा खालच्या पोस्ट वर. हऱ्या पर्मनंट झाला, पण त्याला मुंबईत स्वतःची रूम मात्र घेता आली नाही, तो भाड्याने बिल्डिंग मध्ये राहायचा. पण स्वतःची रूम आहे असं जगभर केलं.

दररोज न चुकता कामावरून सूटताना व्हिस्कीची एक कॉर्टर आणि एक नाईंटी घेऊन यायला अज्जीबात चुकायचा नाही, हे नेहमी चालायचं. हऱ्या ने चैनी केल्या, दागदागिने केले, म्हणजे जितका पैसा येतं होता तितका बचत करायचं सोडून तो पैसा खर्च होत चालला होता. त्यामुळे बचत होत नव्हती. पर्मनंट होऊन ही जशी आर्थिक बाजू मजबूत व्हावी तशी होत नव्हती. हऱ्या आणि शशी नेहमी लोकल ट्रेनने प्रवास करीत आणि शक्यतो अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना आरक्षणावर दोघांच्या गच्च भरून गप्पा रंगत शेवटी हऱ्या अंतिम चर्चेच्या टिपेच्या अंशाला पोचल्यावर एकच बोलायचा शेवटी आरक्षणवाल्यानेच तुला कामाला लावलाय, त्यावर शशी गप्प बसायचा. अगदी मस्त चाललं होतं. हिऱ्याचा माज दिवसेंदिवस वाढू लागला गावांत आला की कॉलेजात शिकणाऱ्या पोरांना तास दोन तास बोलत बसायचा. गावांत कलाकार मांडळी जास्त होती त्यांना बोलायचा. नाचकाम करण्यापेक्षा चांगली नोकरी करा. मी बघा कुठचा कुठे गेलो. सरकारी नाय तर चांगली नोकरी ज्याची आहे त्याला पोरी सुद्धा कचकन मिळतात. आणि असं बरंच काही तो गावभर पोरांना सांगायचा. त्याचा फिरताना चेहऱ्यावरचा पर्मनंट कामाचा माज दिसायचा आपण इतरापेक्षा किती वेगळे आहोत, असाच अविर्भाव असायचा. तोंडाने फटकळ होत गेला.

त्याने शेवटी बायकोच्या म्हणण्याने लोन वर कांदिवली परिसरात एक वन बी एच के रूम केली. फोर व्हीलर गाडी लोन वर घेतली गावाकडे घर बांधलं. हऱ्याच्या डोक्यावर आता जबरदस्त कर्जाच बोचकं असल्यागत वाटू लागलं पण तरीही तो निश्चिंत होता. आपण पर्मनंट आहोत, कोणीच आपलं वाकड करू शकत नाही. त्याचं दारूचं प्रमाण वाढलं. तो आता दिवसा कामात ही पिवून जाऊ लागला. निर्धास्त माणूस जगावं तर असं अश्या प्रकारे त्याचं आयुष्य पाहून कोण ही बोलेल साला जगावं तर असंच.

अचानक जगावर कोरोना नावाच संकट आलं आणि लॉकडाऊन झाला. सगळ बंद हऱ्या महिनाभर घरी आणि तरी पगारीच काही टेन्शन नव्हतं. बाहेर करोडो नोकऱ्या गेल्या तरी आपल्याला काहीच फरक नाही, कारण आपण पर्मनंट नोकरदार आहोत. हऱ्याने महिनाभर जीवाची मुंबई केली, आणि पुन्हां कामं सुरु झालं. लोकांच्या नोकऱ्या गेल्यापासून हऱ्याला दिवसामागे चार-पाच कॉल येऊ लागले की, आमच्या पोराला कुठं तरी चिपकवा म्हणून. हऱ्या ट्रेन मधून जाताना शशीचे कान चावायचा “साला मी सांगत होतो सरकारी नोकरी साठी ट्राय करा कारण पर्मनंट नोकरी असली की साला तुम्ही पादलात ना तरी लोकं कापूरचा वास समजून तुम्हाला स्माईल देतात”. आत्ताच्या सरकारने जेवढं केलं तेवढं कुठच्या सरकारने केलं नाही. बघ साला नाहीतर अश्या काळात मागच्या सरकारने आपल्या सुद्धा नोकऱ्या खाल्ल्या असत्या. आजचं सरकार हा शशीचा आवडता विषय. त्याच्यासाठी आजचं केंद्र सरकार हे रामराज्यचं होतं. त्यामुळे ट्रेन मधून जाताना आता दोघांची एकचं चर्चा असायची ती म्हणजे आपलं सरकार. घरी जाताना एकदिवस हऱ्याच्या मानत काय आलं, तो शशीला म्हणाला शशी आज माझ्या घरी बसू. शशी तयार झाला एक खंबा घेतला घरी गेले, फ्रेश झाले आणि एक एक पेग भरला आणि आय पी एल. बघू लागले. इतक्यात ऑफिसच्या ग्रुप वर सटासट एसएमएस आले. हऱ्याने वैतागून फोन फ्लाईट मोड वर टाकला पण शशीचा फोन वाजत राहिला. शशीने वैतागून एवढे कसले म्हणून sms पहिले आणि त्याला दरदरून घाम फुटला त्याचा घाम बघून हऱ्याने विचारलं ” काय  रे ऑफिस मध्ये कोणी पॉजिटीव्ह सापडला काय “? शशीने सांगितलं तुझ्या फोन वर बघ आणि तशीच शशीने आपली बॅग उचलली आणि घराचा रस्ता धरला. हऱ्याने वॉट्सअप चाट उघडले पाहतो तर टीव्ही वरील बातम्याचे फोटो काढून कोणीतरी पाठवलेले ” पर्मनंट कामगारांना कॉन्ट्रॅक बेसवर ठेवण्याची कंपन्यांना मुभा, कंपन्यात ३०० पेक्षा कमी संख्या असल्यास सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ शकणार, हऱ्याला आता दरदरून घाम फुटला त्याला पूर्ण चित्र डोळ्यासमोर घुमू लागली. घर, गाडी, पोरांचं शिक्षण, ऑफिस मधला बॉस रवींद्र तिवारी जो आपल्याला हाकलून लावता कसं येईल यांचा विचार करत बसला आहे, शशी जरी आपल्या तोंडावर चांगलं बोलत असला तरी त्याची मोठ्या साहेबापर्यंत ओळख. त्याला एकदमच गारठल्या सारखं झालं त्या रात्री तो जेवलाही नाही झोपला ही नाही, आपलं या पुढचं आयुष्य हे डोक्यावर टांगती तलवार घेऊनच जगावं लागणार हे मनाशी पक्क केलं. दुसऱ्यादिवशी ट्रेन मधून जाताना दोघ एकमेकांशी काहीच बोलले नाहीत शेवटी न राहून शशी बोललाच” या सरकारने आपला कायमचाच बूच मारला रे, आपल्याला कधीही उडवून हे आपले लोकं भरू शकतात. हऱ्या म्हणाला “घ्या आता उडवून रामराज्य आलाय ना.” आता नेहमी सारखी रंगीन संध्याकाळ होत नाही वाद विवादाला कोणता विषय नसतो. सतत भीती मनातं असतें, झोप लागतं नाही. म्हणजे गोट्या आपल्याच पण समोरच्याच्या मर्जीशिवाय त्या खाजवू शकत नाही अश्या काहीश्या अवस्थेत हऱ्या जगणं सुरू झालं.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *